माण तालुका सांगली जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या भौगोलिक क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र असणारा व पुर्ण विस्तीर्ण पसरलेला असून त्याचे क्षेत्रफळ १५०६५० हेक्टर आहे. त्यापैकी ७७९९६ लागवडी खालील क्षेत्र हेक्टर असून बागायत क्षेत्र २१००० हेक्टर व जिराईत क्षेत्र ५८९६८ हेक्टर आहे. पडीक क्षेत्र ९६ हेक्टर आहे.
माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाची वार्षिक सरासरी ७४५.२८ मि. मी. इतकी आहे. तालुका हा कायम दुष्काळी तालुका असल्यामुळे शेतीपासूनचे उत्पन्न कमी मिळते. सन २०१९-२० मध्ये ५७२ मि. मी. पाऊस पडला असून, तो सरासरी पेक्षा जास्त पडला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. सन २०१५-१६ पासूनची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती ती कमी झाली आहे. तसेच या विकास गटात सन २०२१-२२ मध्ये एकूण ६३५.१९ मि. मी. इतका पाऊस पडला आहे.
सन २०११ चे जनगणनेप्रमाणे तालुक्यांची लोकसंख्या २२५६३४ असून पुरुष ११४२०२ व स्त्रिया १११४३२ आहेत. ग्रामीण लोकसंख्या २०१५१४ व शहरी लोकसंख्या २४१२० आहे. महसुली गावांची संख्या १०५ असून तालुक्यात ९५ ग्रामपंचायती आहेत. तसेच म्हसवड येथे नगर परिषद व दहिवडी येथे नगर पंचायत आहे. तालुक्यात माणगंगा ही एकच नदी हंगामी नदी असून सन २०१५-१६ च्या दुष्काळी परिस्थितीत सदर नदी कोरडी पडली आहे. परंतु या वर्षात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे माणगंगा नदी वाहू लागली आहे. या नदीवर राजेवाडी तलाव बांधणेत आला असून यातील पाण्यापासून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील शेतजमीनीस पाणी पुरवठा होत आहे. तसेच माण गंगा नदीवर बोडके गावाजवळ आंधळी पाटबंधारे प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील सुमारे १२२२ हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येते. या शिवाय पिंगळी बु. राणंद, जाशी ढाकणी, देवापूर, लोधवडे याठिकाणी सिंचन तलाव आहेत. या वर्षात झालेल्या पावसामुळे हे तलाव पुर्ण क्षमतेने भरले असून माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कमी होणेस मदत झालेली आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ०५, उपकेंद्रे ३२, आयुर्वेदिक दवाखाने २, पशुवैद्यकीय दवाखाने अ श्रेणीचे ६ व ब श्रेणीचे ७, प्राथमिक शाळा २६९, माध्यमिक शाळा ७०, अंगणवाडी ३१९, व मिनी अंगणवाडी १२४ आहेत. तसेच धार्मिक स्थळे शंभू महादेव शिखर शिंगणापूर, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी (गोंदवले बु.), श्री. सिद्धनाथ (म्हसवड), श्री क्षेत्र पाणलिंग वावरहिरे ही आहेत. तालुक्यातील धुळदेव, श्री क्षेत्र भोजलिंग (जांभूळणी देवस्थान), श्री क्षेत्र नागोबा देवस्थान (दिवड), श्री क्षेत्र महालक्ष्मी (मोही), श्री क्षेत्र सतोबा देवस्थान (टाकेवाडी), श्री क्षेत्र भैरवनाथ (वारुगड), श्री क्षेत्र सीतामाई देवस्थान (कुळकजाई) नरवणे, श्री क्षेत्र लोणार बाबा (बिदाल), श्री क्षेत्र मशाली देवी (राणंद), श्री क्षेत्र पिंगळजाई देवी मंदीर स्थळ (पिंगळी बु.),श्री क्षेत्र वडजाईदेवी(वडजल), श्री क्षेत्र मल्हारी म्हाळसाकांत (मलवडी), श्री क्षेत्र भैरवनाथ (किरकसाल) ही तीर्थक्षेत्रे सर्व क वर्ग तीर्थक्षेत्रे आहेत.